रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण : मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करणारा विशेष दिन म्हणजे मराठी भाषा गौरव दिन! दरवर्षी २७फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. सदरचा दिवस हा मराठी भाषेचा समृध्द इतिहास, साहित्य आणि संस्कृतीयांचा गौरव करण्यासाठी आहे. तसेच आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृध्दवारशाला उजाळा देण्याचा देखील दिवस आहे. त्या अनुषंगाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधुन अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांना मराठी भाषेविषयी आदर निर्माण व्हावा या करीता शिक्षणाधिकारी(प्राथमिक), रायगड जिल्हापरिषद, अलिबाग-रायगड यांचेमार्फत प्राथमिक शिक्षक श्री.अजित हरवडे यांचे व्याख्यान आयोजित करुन मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. शिक्षक
श्री.अजित हरवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना २७ फेब्रुवारी हा दिवस जेष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा.शिरवडकर) यांच्या जयंती निमित्त साजरा केला असल्याचे सांगितले तसेच मराठी भाषा हि थोर संत, विचारवंत व साहित्यिक यांनी समृध्द केलेली असल्याने मराठी भाषा जगभरात बोलली जाते. मायबोली मराठी भाषा ही आपली ओळख, आपली शान, आपला अभिमान असुन आपल्याला मराठी भाषेविषयी अभिमान वाटला पाहिजे तसेच मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसुन आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची ओळख आहे. त्यामुळे मातृभाषेचे जतन आणि संवर्धन करणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. तरी सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचे संवर्धन करण्यासाठी योगदान देण्याबाबत बंद्यांना मार्गदर्शन केले.
सदर उपक्रम हा मा.डॉ.सुहास वारके (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा.श्री.योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्री.विशाल बाळासाहेब बांदल(अधीक्षक) अलिबाग जिल्हा कारागृह, श्रीमती ललिता दहितुले मॅडम शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व श्री.संतोष शेडगे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग. श्री.अजित हरवडे (शिक्षक), डॉ.मिलींद पाटिल (उपाध्यक्ष) प्रबोधन सामाजिक सेवा संस्था,अलिबाग तसेच श्री. सुनिल कोंडीराम जाधव (हवालदार), श्री.सतिष जुंबळे (का.शिपाई) इत्यादी कारागृह अधिकारी/ कर्मचारी उपस्थीत होते.
