रायगड लोकधारा वृत्त :
अलिबाग प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील बीड-जांबरुंग आदिवासी वाडीमध्ये १३ मे रोजी रात्री एक भयानक प्रकार घडला. हळदी समारंभात डीजेवर बेधुंद नाचणाऱ्यांना कपडे काढून नाचू नका असे सांगितल्याने दोन भावांवर लोखंडी कालथ्याने हल्ला करण्यात आला. यात अनंता गोपाळ वाघमारे (वय ४०) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा भाऊ विलास वाघमारे (वय ३८) गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना विकास पवार यांच्या हळदी समारंभात घडली. बाळू ऊर्फ बिटया मधूकर मुकणे (रा. स्टूल वाडी) व प्रकाश रमेश पवार (रा. बीड जांबरुंग) हे दोघे अत्यंत बेधुंद अवस्थेत शर्ट काढून डीजेवर नाचत होते. त्यांना विलास वाघमारे यांनी महिलांपुढे अश्लील वर्तन थांबवण्यास सांगितले असता, त्या दोघांनी रागाच्या भरात लोखंडी कालथ्याने त्याच्यावर हल्ला चढवला.
भांडण मिटवण्यासाठी अनंता वाघमारे मध्ये पडले असता, त्यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला. विलासच्या डोक्याला सहा टाके पडले असून अनंता वाघमारे यांना रुग्णालयात नेत असतानाच मृत घोषित करण्यात आले.
घटनेनंतर आरोपी पसार झाले होते, परंतु खोपोली पोलीसांनी बाळू मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. प्रकाश पवार हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी विलास वाघमारे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
