रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : नवी मुंबईच्या खारघर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कॅटरर्सकडे मजुरीचं काम करणाऱ्या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.
ओवे कॅम्प येथील भोईर चाळीत राहणारे सोनुकुमार उर्फ सोनू महेंद्रकुमार यादव आणि सुग्रीम उर्फ सुरज चौधरी निशाद हे जगदीश बुटोलिया या कॅटरर्स मालकाकडे काम करत होते. त्यांच्यासोबत करणकुमार उर्फ करण (वय २५) देखील मजुरीचे काम करत होता. रात्री, तिघे सोनुकुमार यांच्या घरी एकत्र जमले असताना, मालक बुटोलिया यांच्या स्कुटी कोण चालवणार यावरून वाद झाला. या क्षुल्लक वादाने गंभीर वळण घेतले. वाद विकोपाला गेल्यावर सुग्रीम व सुरज या दोघांनी लाकडी दांडक्याने करणच्या डोक्यात व शरीरावर जबरदस्त प्रहार करून त्याला रक्तबंबाळ केले. शेजाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शितल पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस पथकाने घटनास्थळावरून दोन लाकडी दांडे, एक लोखंडी फावडा, तसेच रक्ताचे नमुने व इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. आरोपींना पळून जाण्याआधीच अटक करण्यात आली असून, ते दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. जरी हत्या स्कुटीवरून झालेल्या वादातून झाल्याचं सांगितलं जात असलं, तरी पोलिस तपासातून या घटनेमागचं खऱ्या कारणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
