- रायगड लोकधारा वृत्तसेवा :
“अपघातग्रस्तांना मदत नको… अपघातच नको!” प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काळाची गरज …
साबीर शेख खोपोली : पाली फाटा येथील रस्ता सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे , -इम्याजिका तसेच पाली–खोपोली मार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने येथे दिवसभर मोठी वाहतूक असते. मात्र रस्त्यावरील खड्डे, उखडलेला डांबराचा थर आणि असमतोल पृष्ठभाग यामुळे लहान-मोठ्या वाहनांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिक व प्रवासी वाहनचालकांनी सांगितले की, पावसाळ्यानंतर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेअभावी अपघाताचा धोका वाढत असून, मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहनचालकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त करत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. “हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अपघात घडल्यानंतरच कारवाई होणार का? अपघात सेवा भावी संस्था सहकार्य करणार का..?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित करत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा नागरिकांच्या आक्रोशाला प्रशासनाला तोंड द्यावे लागेल असे चित्र समोर येत आहे.
