रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली येथील ‘शिवदत्त आश्रमात’ मे २०२५ पासून अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नवनाथ गवळी नावाच्या भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ३४ वर्षीय महिलेने धैर्याने पुढे येत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. आरोपीने पीडित महिलेच्या अंधश्रद्धेचा आणि अगतिकतेचा फायदा घेत, १७ जुलै २०२५ रोजी ‘अंगातील दोष दूर करण्याच्या’ बहाण्याने तिचा विनयभंग केला आणि अत्याचार केला. तपासात असे समोर आले आहे की, आरोपी महिलांच्या अंगात येण्याचे थोतांड रचून त्यांच्यावर मानसिक ताबा मिळवायचा आणि मग ‘दोष निवारण’ करण्याच्या नावाखाली त्यांचे शोषण करायचा. पीडितेने सुरुवातीला कौटुंबिक प्रतिष्ठेपोटी मौन बाळगले होते, मात्र फोनवर होणारा त्रास आणि इतर प्रकरणांतून मिळालेल्या प्रेरणेमुळे तिने सत्य मांडले. खेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी आरोपी अद्याप मोकाट असून, तो न्यायालयीन प्रक्रियेलाही दांडी मारत आहे. यामुळे पीडितेचे कुटुंब दहशतीखाली असून, अशा भोंदूगिरीला वेळीच लगाम घालण्याची मागणी होत आहे.
