रायगड लोकधारा वृत्तसेवा :
खालापूर साबीर शेख : सावरोली–पेण रस्तावरील एक्सप्रेस ब्रिजखाली सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामादरम्यान वाहतूक कोंडी झाल्याची घटना घडली. संबंधित ठिकाणी एकतर्फी वाहतूक सुरू असताना भर रस्त्यात एक ट्रक अचानक बंद पडल्याने काही काळासाठी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.
ट्रक बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कामानिमित्त, शाळा-कार्यालयासाठी निघालेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. काही वाहनचालकांनी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अरुंद रस्ता आणि सुरू असलेले काम यामुळे वाहतुकीचा ताण वाढत गेला.
घटनास्थळी महामार्ग वाहतूक नियंत्रण विभाग अथवा संबंधित रस्ते ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने बंद पडलेला ट्रक बाजूला करण्यास विलंब झाला. परिणामी वाहतूक सुरळीत करण्यास अधिक वेळ लागला.
रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान योग्य नियोजन, दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
