रायगड लोकधारा न्यूज :
अहिल्यानगर : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने चार वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी मुलाची आई शितल बदादे आणि तिचा प्रियकर सागर वाघ या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर २०२४ रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील नदीपात्रात ४ वर्षाच्या चिमुरड्याचा गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले होते. यावेळी मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्हाचा तपास हे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र कोपरगाव पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने चार वर्षांच्या कार्तिकची ओळख पटवून त्याच्या हत्येच कोडं सोडवलं आहे.
निफाड तालुक्यातील साकोरी मिग येथे वास्तव्यास असणाऱ्या कार्तिकच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून केला. त्यानंतर मृतदेह गाठोड्यात बांधून दुचाकीवरुन नेऊन गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मयत कार्तिकची आई शितल ही पतीपासून वेगळी राहत होती. कार्तिक देखील आईसोबत राहत होता. यादरम्यान तिचे सागर याच्यासोबत प्रेम संबंध जुळले. मात्र कार्तिकचा अडसर निर्माण होत असल्याने दोघांनी त्याच्या हत्येचा प्लॅन केला आणि त्यानुसार चिमुकल्याची हत्या केली.
कार्तिकचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वडील ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी आपली बायको शितल व तिच्या प्रियकराबाबत माहिती देत त्यांनीच हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला, मात्र हत्या झाल्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देत होते. पोलिसांचा अहिल्यानगरसह नाशिक जिल्ह्यात तपास सुरू असताना सदरची महिला ही दिंडोरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शितलला दिंडोरी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी सागर वाघ याला देखील पोलिसांनी अटक केली.
