रायगड लोकधारा वृत्तसेवा :
🔴 रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नक्की कोण होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज भरत गोगावले यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई प्रतिनिधी : राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष झाल्यानंतर अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांची तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजप नेते गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे. भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावर रस्सीखेच सुरू होती. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना शह-काटशह देण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र आता अखेर या स्पर्धेत गोगावले यांनी बाजी मारत पालकमंत्रिपद मिळवलं आहे. तर दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आग्रह डावलत भाजपने नाशिकचं पालकमंत्रिपद आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून मोठा तिढा निर्माण झाला होता. रायगडचं पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आग्रही होते, तर पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर महायुतीतील तीनही प्रमुख पक्ष दावा सांगत होते. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकमेकांचे पारंपरिक राजकीय विरोधक राहिले आहेत. मात्र नव्या राजकीय समीकरणांमध्ये दोन्ही पक्ष महायुतीच्या माध्यमातून एकत्रित काम करत आहेत. दोन्ही पक्षांचं जिल्ह्यात वर्चस्व असताना पालकमंत्रिपदाची धुरा कोणाकडे द्यायची, यावरून मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. एकीकडे राष्ट्रवादीतून आदिती तटकरे तर दुसरीकडे शिवसेनेकडून भरत गोगावले या पदासाठी उत्सुक होते. भरत गोगावले यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतर आमदारांकडून जाहीरपणे तटकरे यांच्यावर निशाणा साधला जात होता.
कसा सुटला रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा ?
मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला तो नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमुळे. या निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी तर, शिवसेनेकडून भरत गोगावले यांच्या मुलासाठी आग्रह धरण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेने हा मतदारसंघ अनिकेत तटकरे यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय घेत त्याबदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद गोगावले यांनी आपल्या पदरात पाडून घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील महायुतीतील पक्षांच्या या राजकीय समीकरणांबाबत तुम्हाला काय वाटते? रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदांच्या वाटपावर तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.
