रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा वृत्तसेवा / उरण प्रतिनिधी पूजा चव्हाण : उरण शहर म्हटले की पहिल्यांदा नजरेसमोर येतो तो कोटनाका. हाच उरणचा मुख्य दरवाजा आहे. सुमारे ८०० ते ९०० वर्षांपूर्वीच्या द्रोणागिरी किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार असून पूर्वी उरण आणि करंजा बंदरावरून होणाऱ्या सागरी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. आज किल्ल्याचे फारसे अवशेष शिल्लक नसले तरी हा दरवाजा आजही उरणच्या ऐतिहासिक वैभवाची, सागरी पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. म्हणूनच उरणकरांसाठी कोटनाका हा केवळ नाका नसून उरणची शान आणि ओळख आहे.

याच ऐतिहासिक कोटनाका परिसराला लागून असलेल्या बुरुड आळीमध्ये दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. बुरुड आळीचा गणपती हा उरणमधील एक जागृत आणि मानाचा गणपती मानला जातो.
गणेशोत्सवाचा इतिहास पाहिला तर गणेश आराधना ही प्राचीन काळापासून आहे. पेशवे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही ती होत होती, पण ती घरापुरती मर्यादित होती. ब्रिटिश राजवटीत सभांवर बंदी असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 साली पुण्यातील केशवजी नाईक चाळीत पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून या उत्सवाला स्वातंत्र्य चळवळीचे व्यासपीठ बनवले.

याच परंपरेचा वारसा जपणारे येथील मानाचे मंडळ म्हणजे राजे शिवाजी मित्र मंडळाचा *”उरणचा राजा”*. 1992 साली स्थापन झालेल्या या मंडळाचे यंदा 35 वे वर्ष असून उरण कोटनाका, बुरुड आळी येथे सार्वजनिक श्री गणेशोत्सव 2026 मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असून किल्ल्याच्या दरवाजाजवळ असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विलास खैरे आणि अध्यक्ष श्री. कल्पेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची मूर्ती कालामंदिर आर्ट्स, वरळी मुंबई येथून आणण्यात आली आहे. उपाध्यक्ष प्रितम ठाकूर, सेक्रेटरी गितेश नागे, खजिनदार अनिकेत पुगांवकर, सहखजिनदार हेमंत पत्रे, कार्याध्यक्ष रितेश गायकवाड, संघटक दिपक खैरे, सहसेक्रेटरी साई गाडे यांच्यासह धिरज पडवळ, प्रथमेश गायकवाड, संकेत गायकवाड, सुरज पडवळ, विशाल जाधव, जयेश म्हात्रे, विराज कोळी, आयुष तेलंगे, रोहित पुगांवकर या कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता वरळी येथून श्रीच्या भव्य आगमनाने झाली आणि सायंकाळी 6 वाजता उरणमध्ये आगमन मिरवणूक निघाली. दि. 14 रोजी श्रींची स्थापना झाल्यानंतर 15 रोजी दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन झाले. त्यानंतर 16 रोजी वृक्षारोपण, 17 रोजी चित्रकला स्पर्धा, 18 रोजी भजन व गौरी स्थापना आणि महिला विशेष कार्यक्रम, 19 रोजी गौरी विसर्जन आणि 20 रोजी कॅरम स्पर्धा व लहान मुलांचे खेळ असे कार्यक्रम पार पडले आहेत. पुढील कार्यक्रमात दि. 22 रोजी लायन्स क्लब ऑफ उरण आणि डॉ. असोसिएशनच्या वतीने मेगा मेडिकल कॅम्प, दि. 23 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, दि. 24 रोजी सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद आणि दि. 25 रोजी भव्य विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे.
अशा प्रकारे 800 वर्षांचा इतिहास जपणाऱ्या कोटनाका दरवाजाच्या साक्षीने बुरुड आळीचा उरणचा राजा हा केवळ उत्सव नसून उरणच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा संगम ठरला आहे.
