रायगड लोकधारा वृत्त :
पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. विशेष म्हणजे ट्रस्टकडून त्यासाठीची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे, पाश्चिमात्य म्हणजेच वेस्टर्न कपडे परिधान करुन भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही. दरम्यान, जेजुरी देवस्थानचा हा नियम केवळ जेजुरीतील खंडोबा देवस्थानसाठी लागू असणार आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असं देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे ट्रस्टला अपेक्षित नाहीत. त्यामुळेच, असे कपडे न घालण्याचे नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्यावतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. त्यामुळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेजुरीला देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी हे नियम पाळायचे आहेत.

