रायगड लोकधारा वृत्त :
प्रतिनिधी पनवेल : नवी मुंबईला लागून असलेल्या पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शाळेची बस चालवणाऱ्या व्यक्तीने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडित मुलीला शाळेत सोडण्याचा बहाणा करत तिला एका शेतात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं बसमध्ये मुलीवर अत्याचार केला. घडलेला प्रकार पीडितेच्या आईला समजल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 3 मार्चला सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होती. यावेळी एका स्कूल बस चालकाने मुलीला तुला शाळेत सोडतो म्हणून बसमध्ये बसवलं. यानंतर आरोपी तिला जवळच निर्जनस्थळी असलेल्या एका शेतात घेऊन गेला. याठिकाणी नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक घटना उघडकीस येताच पनवेल पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात दाखल केलं असता त्याला 18 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
घटनेच्या दिवशी नक्की काय घडलं?
3 मार्चला सकाळी साडे सहा वाजता पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी एका बस स्टॉपवर थांबली होती. यावेळी नराधम आरोपी दुसऱ्या शाळेची बस घेऊन तिच्याजवळ गेलाय. त्याने तुला शाळेत सोडतो, असे सांगून बसमध्ये बसवलं. ही घटना सकाळी साडे सहा वाजताची असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. याचा फायदा घेऊन नराधम आरोपी बस घेऊन शेतात गेला.
शेतात गेल्यावर ‘तू मला आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो’, असं आरोपी पीडितेला म्हणाला. यानंतर आरोपीनं तिच्यावर बसमध्येच बलात्कार केला. मुलीने घाबरून अनेक दिवस याची माहिती घरात कुणालाही सांगितली नाही. मात्र दोन दिवसापूर्वी 13 मार्चला मुलीनं आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची माहिती मिळताच मुलीच्या आईने पनवेल पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तातडीने आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र शाळकरी मुलीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास पनवेल पोलीस करत आहेत.
