रायगड लोकधारा वृत्त :
पेण प्रतिनिधी : पेण : दादर गावामध्ये १७ वर्षात सेझ कंपनी अथवा शासनाच्या भूसंपादन अधिनियमाप्रमाणे कोणताही प्रकल्प आला नाही, तसेच नापीक झालेल्या जमिनींमुळे बेरोजगारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शासनामार्फत एमआयडीसीसारखे प्रकल्प राबवण्यात यावे याबाबत रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर विकास मंत्री यांना ज्येष्ठ शिवसैनिक सुर्याजी नारायण पेरवी, दादरचे उपसरपंच राहूल गजानन पेरवी तसेच ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले.
या निवेदनानुसार मागणी करण्यात आली असून यात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील दादर गावात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जात होती. मात्र सन १९८९ साली आलेल्या महापुरामुळे संपुर्ण दादर गावाची दुर्दशा झाली. गावाचा संरक्षक बंधारा पुर्णपणे तुटून गेला. त्यामुळे समुद्राचे खारे पाणी भातशेतीमध्ये शिरून संपुर्ण दादर गावातील भातशेती ओसाड झालेली आहे. सन १९८९ सालापासून ते आजपर्यंत दादर गावातील संरक्षक बंधाऱ्यावर शासनाने दुरूस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे समुद्राचे खारेपाणी शिरून दादर गावची जमीन नापीक झालेली आहे. तसेच आजपर्यंत शासनामार्फत कोणत्याही सुविधा, योजना या दादर गावातील लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. संपूर्ण शेती गेल्यामुळे गावातील लोकांचा शेतीचा व्यवसाय पुर्णपणे बंद पडला आहे. दादर गांव हे एक बेट असल्याने शेती गेल्यावर गावातील लोकांनी मच्छी व रेतीचा (हातपाटीची वाळू) व्यवसाय सुरू केला. पण पाताळगंगा नदीमध्ये रसायनीमधील कंपनीचे दुषीत पाणी, रसायन युक्त पाणी या खाडीमध्ये सोडल्याने संपुर्ण खाडी देखील दुषीत झालेली आहे. पर्यायाने मच्छीचा व्यवसाय देखिल बंद झाला. तसेच शासनाने वाळूची रॉयल्टी वाढविल्यामुळे तो ही व्यवसाय बंद झालेला आहे. यामुळे लोकांची उपासमार होत आहे. दादर गावची जमीन १८०० ते १९०० एकर असून सध्या ती शासनाचे नाकर्तेपणामुळे पडीक झालेली आहे. सन २००६-०७ मध्ये शासनाने मुंबई सेझचा प्रकल्प हाती घेतला आणि भूसंपादनाचे कलम ४ (१) ची अधिसूचना जाहीर केली. त्यानंतर सेझ कंपनीने दादर गावातील काही जमीन मिळकतींचे साठेकरार करून घेतले. आपल्या गावात प्रकल्प येतो म्हणून गावातील लोकांनी सेझ कंपनी बरोबर साठेकरार केले. परंतु जवळपास १७ वर्ष पूर्ण झाली मात्र दादर गावामध्ये सेझ कंपनीने अथवा शासनाने काढलेल्या भूसंपादनाचे अधिनियमाप्रमाणे कोणताही प्रकल्प आणलेला नाही. त्यामुळे गावातील तरुणपिढी बेरोजगार होऊन पुर्णपणे बरबाद होण्याचे मार्गावर आहे.
सेझ कंपनीने १७ वर्ष पुर्ण होऊन देखिल दादर गावातील जमीनींचे साठेकरार करून घेऊन कोणताही व्यवसाय, प्रकल्प सुरू केलेला नाही. त्यामुळे आमचे गावात दुसरी कोणतीही कंपनी आता येणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत औद्योगिक प्रकल्प (एमआयडीसी) दादर गावात राबवावा अशी मागणी होत आहे. तर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालून उद्योग मंत्री, महसुल मंत्री यांची संयुक्त बैठक आयोजीत करण्याचे प्रयत्न करून, समन्वय साधून दादर गांवामध्ये औद्योगीक विकास महामंडळामार्फत औद्योगीक प्रकल्प आणून गावाचा विकास साधावा अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक सुर्याजी नारायण पेरवी, दादर उपसरपंच राहूल गजानन पेरवी, अॅड. स्वागत पाटील, नरेंद्र पाटील, रुपेश ठाकूर व ग्रामस्थांकडून होत असून याबाबत निवेदन देण्यात आले.
