रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बबनदादा पाटील यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.
बबनदादा पाटील हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असून, त्यांनी यापूर्वी रायगड जिल्हाप्रमुख, जिल्हा सल्लागार आणि जिल्हा संपर्कप्रमुख अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पक्षाच्या विविध आंदोलनांत आणि संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.
शिवसेनेच्या उपनेतेपदाची जबाबदारी ही पक्षाच्या कार्यपद्धतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही जबाबदारी मिळाल्यानंतर बबनदादा पाटील यांच्याकडून पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याशिवाय नवी मुंबईतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विठ्ठल मोरे यांचीही उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून, हे दोघेही पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.
