रायगड लोकधारा वृत्तसेवा :
खोपोली / खालापूर प्रतिनिधी : मुंबई–पुणे महामार्गवरील खालापूर टोल नाक्याजवळ ट्रकचालकावर लूटमारीचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.दि.२२फेब्रुवारी रोजी पहाटे ०६ वाजता ट्रक क्रमांक MH-10-CR-5456 चे चालक-मालक गणेश नागरगोजे यांचे वाहन तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या कडेला उभे असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर जोरजबरदस्ती करत मारहाण केली आणि पैशांची मागणी केल्याची माहिती आहे.
घटनास्थळी उपस्थित इतर वाहनचालकांनी सांगितले की, संबंधित तरुणांनी धमकावत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे महामार्गावरील चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा कथित आरोप करण्यात येत आहे. “तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर करा,” असे सांगत पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली नसल्याची माहिती उपस्थित चालकांनी दिली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ खालापूर सचिव साबीर शेख यांना चालकवर्गाने संपूर्ण घटनाक्रम कथन केल्याचे समजते.
महामार्गावर वाढत्या लूटमारीच्या घटनांमुळे टोल प्रशासन, आयआरबी व्यवस्थापन आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. २४ तास सुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्ही देखरेख असतानाही अशा घटना घडत असल्याने रस्ते सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चालकवर्गातून होत आहे.
( वाहन व चालक माहिती MH-10-CR-5456 / गणेश नागरगोजे ( 8530376037 )
