रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा | नवी मुंबई प्रतिनिधी : वाशी खाडी परिसरात एखादी व्यक्ती पाण्यात पडल्याची घटना घडली किंवा मृतदेह बाहेर काढण्याची वेळ आली की प्रशासनाला सर्वात आधी आठवण येते ती वाशी गावातील धाडसी मच्छीमार महेश सुतार यांची. अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी पाण्यात उडी मारून लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि अनेक मृतदेहही खाडीतून बाहेर काढले आहेत.
मात्र या धाडसी कामामागे एक वेगळीच वास्तवता समोर आली आहे. महेश सुतार यांनी सांगितले की, वाशी खाडी पुलावर एखादी दुर्घटना घडली की प्रशासन त्यांच्या बोटीचा वापर करून घेतो. पण त्या वेळी बोटीचे भाडे, डिझेलचा खर्च किंवा इतर कोणतेही मानधन दिले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
“नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सर्व सुविधा मिळतात. मात्र पाण्यातील कामांसाठी माझ्या बोटीचा वापर होतो, तरीही मला कोणतीही आर्थिक मदत किंवा खर्च दिला जात नाही,” असे सुतार यांनी सांगितले.
तसेच अनेक वेळा समाजसेवक, आमदार, खासदार किंवा नगरसेवकांकडून त्यांचा सत्कार केला जातो. मात्र त्या सत्कारात ट्रॉफी आणि सन्मानचिन्हे दिली जातात, पण प्रत्यक्ष आर्थिक मदत दिली जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“घरात इतक्या ट्रॉफी ठेवायला जागा नाही. सत्कारासाठी बोलावतात म्हणून मी माझा मासेमारीचा धंदा बंद करून तिथे जातो. पण ट्रॉफीने घर चालत नाही. त्यापेक्षा बंद पाकिटात मानधन दिले तर घरगुती गरजा पूर्ण होऊ शकतात,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
याशिवाय काही राजकीय लोक केवळ प्रसिद्धीसाठी सत्कार करतात, पण प्रत्यक्ष मदत करत नाहीत, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता ट्रॉफी आणि सत्कार स्वीकारणे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी रागाच्या भरात सांगितले.
महेश सुतार यांचे घर लहान असून त्यांनी शासनाकडे एकच मागणी केली आहे – नवी मुंबई महानगरपालिका किंवा अग्निशमन विभागाकडून कायमस्वरूपी रोजगार किंवा नियमित मानधन द्यावे, कारण समुद्र आणि खाडीत जीव धोक्यात घालून काम करणारे आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.
समाजासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अशा मच्छीमारांना केवळ सन्मानच नव्हे तर प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि अधिकृत मान्यता मिळणे गरजेचे आहे, अशी भावना आता स्थानिक नागरिकांतूनही व्यक्त होत आहे.
