रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल / केवल महाडिक : नवी मुंबई पोलिसांच्या ॲंटी नारकोटिक्स सेलने कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ (ड्रग्ज) प्रकरणात अटक केलेला आंतरराज्यीय टोळीचा मुख्य सूत्रधार ‘लवजित सिंग’ याने पोलिसांना चकमा देऊन शनिवारी रात्री कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून पलायन केले. या खळबळजनक घटनेमुळे नवी मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि कार्यक्षमतेचा बुरखा फाटला असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नाट्यमय पलायन आणि दोन साथीदार जेरबंद…
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपीला वैद्यकीय तपासणी किंवा पुढील तपासाच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा फायदा घेत लवजित सिंगने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली.त्याला पळताना पाहून त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन आरोपी साथीदारांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून त्या दोघांना जागच्या जागीच दबोचले. परंतु, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य दुवा आणि मास्टरमाईंड असलेला लवजित सिंग पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांची विविध शोधपथके सध्या त्याचा माग काढत आहेत.
आरोपी पळाला की पळवला ?’ – संशयाची सुई…. पोलिसांवरएवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्यीय पातळीवर ड्रग्ज रॅकेट चालवणारा शातिर गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या आवारातून इतक्या सहजतेने पळून कसा जाऊ शकतो, यावर आता कायदेशीर आणि सामाजिक वर्तुळातून गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत.आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय: कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल गुंतलेली असते. त्यामुळे आरोपी ‘स्वतः पळाला की त्याला जाणीवपूर्वक पळवून लावण्यात आले?’, असा थेट संशय नागरिकांकडून आणि कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन: गंभीर गुन्ह्यातील आरोपींना हँडकफ (बेड्या) घालणे किंवा त्यांच्याभोवती कडेकोट सुरक्षा ठेवणे अनिवार्य असताना, कामोठे पोलीस ठाण्यात या नियमांची पायमल्ली का झाली, हा चौकशीचा मुख्य विषय बनला आहे.
कामोठे पोलीस ठाण्यात आठवड्याभरातील दुसरी घटना…
विशेष म्हणजे, कामोठे पोलीस ठाण्याच्या हलगर्जीपणाची ही पहिली वेळ नाही. अवघ्या काही दिवसांपूर्वीच रविवारी एका वाहनचोराने (चेतन कातकर) याच पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीतून शौचालयाचा बहाणा करून पलायन केले होते. त्या आरोपीला पोलिसांनी ६ तासांत पुन्हा अटक केली असली, तरी त्या घटनेतून कामोठे पोलिसांनी कोणताही धडा घेतला नसल्याचे या नव्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. एकाच पोलीस ठाण्यात एकामागोमाग एक आरोपी पळून जाण्याच्या घटना घडत असल्याने पोलिसांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे.
निष्काळजी अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी…
या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस वर्तुळात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ ‘ड्युटी डायरी’त नोंद करून किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोकळे सोडता येणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही आणि पोलीस ठाणे सुरक्षित राहिलेले नाही, हे या घटनेवरून स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय कायदेशीर चौकशी करून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि गुन्हेगाराला अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या कामोठे पोलीस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित (Suspend) करावे, अशी जाहीर मागणी जनसामान्यांमधून आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारातून कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी पसार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, निलंबनाची मागणी !
