Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी रत्नागिरी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनबचतीचे आवाहन केल्यानंतर आता राज्यातील मंत्र्यांचे दौरे आणि ताफ्यामधील वाहनांसाठी होणारा इंधन खर्च चर्चेचा विषय झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एक कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि एक राज्यमंत्री योगेश कदम यांच्या दौऱ्यात ताफ्यातील वाहनांचे इंधन आणि वाहनचालक यासाठी दरमहा सुमारे दहा लाख रुपयांहून अधिक खर्च होत असल्याची बाब समोर येत आहे. पंतप्रधानांच्या इंधनबचतीच्या हाकेला राज्य सरकारही प्रतिसाद देणार का, असा प्रश्न आता केला जात आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत बहुतांश शनिवार आणि रविवारी आपल्या मतदारसंघात रत्नागिरीत येतात. मतदारसंघ किंवा काही वेळा अन्य तालुक्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी, कामांची पाहणी करण्यासाठी त्यांचे दौरे होतात . त्यांच्या ताफ्यामध्ये पोलिस, सुरक्षा पथक, महसूल, आरोग्य या यंत्रणांसह त्या त्या विषयाशी संबंधित विभागांचे अधिकारी अशी किमान १० ते १५ वाहने असतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरे मंत्री गृह राज्यमंत्री योगेश कदम हेही बहुतांश शनिवार आणि रविवारी मतदारसंघाचा आणि आसपासच्या तालुक्यांचा दौरा करतात. कदम हे राज्यमंत्री असले तरी त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी असल्याने सरकारी शिष्टाचारानुसार त्यांच्यासोबतही १० ते १५ वाहनांचा ताफा असतो. त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदही असल्याने त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात महसूल खात्याचे अधिकारीही असतात.
या दोन मंत्र्यांचे दौरे आणि त्यांच्यासोबतचा वाहनांचा मोठा ताफा लक्षात घेता इंधन आणि वाहनचालक यासाठी दरमहा होणारा खर्च १० लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पुढे येत आहे.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. हे आवाहन केवळ सर्वसामान्य माणसांनीच मनावर घ्यावे का, ते राज्य सरकारनेही अमलात आणायला हवे. केवळ मंत्रीच नाही तर सरकारी अधिकाऱ्यांनीही आपल्या वाहन वापरावर नियंत्रण आणायला हवे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. तेच आवाहन लक्षात घेत राज्य सरकारही मंत्र्यांच्या दौऱ्यातील ताफ्यामध्ये असलेल्या वाहनांची संख्या कमी करणार का, असाच विषय आता चर्चेचा झाला आहे.
