रायगड लोकधारा वृत्तसेवा :
“वय बदललं, वेळ पुढे गेला… पण दोस्तीची धमक आजही तशीच आहे.
रायगड लोकधारा प्रतिनिधी : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मैत्रीच्या आड कधीच राजकारण येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पनवेलमध्ये आला. रायगड जिल्ह्यातील दोन मातब्बर व्यक्तिमत्वे – लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे जेव्हा एका छोट्याशा स्कुटीवर स्वार होऊन प्रचारासाठी निघाले, तेव्हा पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
बड्या गाड्या सोडल्या, स्कुटी धरली !
रायगडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या या दोन्ही नेत्यांचा रुबाब सामान्यतः महागड्या लक्झरी गाड्यांमधून असतो. एकाच व्यवसायात असूनही, स्पर्धा बाजूला सारून त्यांनी नेहमीच आपली मैत्री जपली आहे. काही वर्षांपूर्वी दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे होते, मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली ते एकत्रित काम करत आहेत.
नेमका प्रसंग काय ?
सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. करंजाडे येथे प्रचारादरम्यान अरुंद रस्ते किंवा लोकांपर्यंत थेट पोहोचण्याच्या उद्देशाने या दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपल्या आलिशान गाड्या बाजूला सारल्या. रामशेठ ठाकूर आणि जे. एम. म्हात्रे एकाच स्कुटीवर बसून प्रचारासाठी निघाले.
कॅमेऱ्यात कैद झाला ‘याराना’!
हा दुर्मिळ नजारा पाहून तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आपला मोह आवरता आला नाही. प्रत्येकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा क्षण टिपला. हा फोटो सोशल मीडियावर येताच त्यावर ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ या गाण्याच्या ओळींसह कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
