🔴 पनवेल महानगरपालिकेने प्रभाग क्षेत्र सभा सुरू करा, प्रहार संघटनेने महापौरांची भेट घेत केली मागणी !
रायगड लोकधारा प्रतिनिधी l पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्थानिक विकास प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमतील तरतुदीनुसार प्रभाग क्षेत्र सभा नियमितपणे आयोजित करण्यात याव्या, जेणेकरून नागरिक व प्रशासनात थेट संवाद निर्माण होईल व नागरिकांच्या समस्या निराकरण होवून लोकशाही बळकटीकरण होण्यास मदत मिळेल. तसेच वार्षिक वेळापत्रक जाहीर करून लोकसहभागाला संस्थात्मक स्वरूप द्यावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने महापौर नितीन पाटील यांची भेट घेत प्रभाग सभा सुरू करण्याची मागणी केली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. सुनील शिरीषकर, जिल्हा अध्यक्ष रायगड प्रहार संघटना यांनी दिली.
तसेच या निवेदनात, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लाखों नागरिक वास्तव्यात असूनही अशा प्रकारचा संवाद यंत्रणा व नागरिक यांच्यात नाही. त्यामुळे अनेक नागरी प्रश्न वेळेवर सुटत नसल्याची खंत प्रहार संघटनेने व्यक्त केली. त्यामुळे प्रहार संघटनेने महापौर नितीन पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले, ज्यात “ लोकसहभागाशियाय लोकशाही म्हणजे मृत लोकशाही आहे “ म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी महापालिकेने प्रभाग सभा तातडीने सुरू कराव्यात, वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, सर्व प्रभागांमध्ये नियमित सभांचे आयोजन करणे. प्रत्येक प्रभागासाठी वार्षिक वेळापत्रक जाहीर करून किमान तिमाही ( दर तीन महिन्यांनी ) बैठक घेणे. सभांचे इतिवृत्त व कार्यवाही अहवाल सार्वजनिक करणे. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर केलेल्या कारवाई अहवाल पुढील सभेत सादर करणे, एका महिन्याच्या आत प्रभाग सभा सुरू करण्याबाबत सविस्तर अमलबजावणी आराखडा जाहीर करणे अशा प्रमुख मागण्या ही प्रहारच्या वतीने करण्यात आल्या, यावेळी सोबत प्रहार संघटनेचे पदाधिकारी डॉ. सुनील शिरीषकर, ऐड. मनोज टेकाडे, राज्य प्रवक्ते, ऐड. अजय तापकिर, संपर्क प्रमुख कोकण, अजय कदम, राहुल, तेलंग, पंकज मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

