रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ तर १५ पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी पार पडली. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. पक्षाने २१ जागा जिंकल्या, पण तरीही पक्ष जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेपासून दूर राहण्याची चिन्ह आहेत.
जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३२९ उमेदवार निवडणूकीत उतरले होते. ७ तारखेला या सर्व जागांसाठी मतदान झाले होते. आज त्याची मतमोजणी पार पडली. शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक २१ उमेदवार निवडून आले. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, भाजपचे १५, शिवसेना ठाकरे गटाचे ५ तर काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना शिंदे गट सत्ता स्थापनेपासून दूर राहण्याची शक्यता आहे.
महायुती मधील विसंवाद आणि वाद यास कारणीभूत ठरणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपने युती केली होती. कर्जत खालापूरचा अपवाद सोडला तर दोन्ही पक्ष इतर ठिकाणी एकत्र लढले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्ष दावा करणार असल्याचे खा. सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.
कर्जत आणि खालापूर मध्ये झालेली पिछेहाट पक्षासाठी अडचणीची ठरली आहे. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात शिवसेनेला चांगले यश मिळाले असले तरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात शिवसेनेचा एकच उमेदवार विजयी होऊ शकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाची आघाडी शिवसेना शिंदे गटावर वरचढ ठरली आहे. कर्जत मध्ये भाजपची जुळवून घेण्याकडे केलेले दुर्लक्ष शिवसेनेसाठी आत्मघातकी ठरले आहे.
पंचायत समिती शिवसेनाच सरस…..
पंचायत समितीच्या ११८ जागांपैकी सर्वाधिक ३७ जांगावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. त्याखालोखाल भाजपचे ३४ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३१ सदस्य निवडून आले. तर शिवसेना ठाकरे गटाचे १३ तर शेकापचे तीन उमेदवार निवडून आले.
