रायगड लोकधारा वृत्तसेवा :
दिनांक : ११ फेब्रुवारी २०२६
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पनवेल : ग्रुप ग्रामपंचायत कोन यांच्या वतीने गावातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने खरेदी करण्यात आलेल्या नवीन घंटा गाडीचे लोकार्पण नुकतेच उत्साहात पार पडले. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदा अतुल घरत यांच्या शुभहस्ते व ग्रामस्थांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमास सरपंच अश्विनी जितेश शिसवे, उपसरपंच निकिता आदेश घरत, माजी उपसरपंच सौ.सविता कैलास म्हात्रे, सदस्य दिपक धाया म्हात्रे, अक्षय मारुती घरत, साहिल बाबुराव म्हात्रे, नीता नितीन म्हात्रे, धनराज नामदेव बडे, अस्मिता अमित गायकर, संजय जाधव, ताईबाई बाळकृष्ण पाटील, अंजनी अनंत पाटील, ग्रामविकास अधिकारी रमेश तारेकर यांच्यासह माजी उपसरपंच जितेश बाळाराम शिसवे, वाहतूक विभाग अध्यक्ष अतुल मारुती घरत, कैलास गोपाळ म्हात्रे, नितीन नथू म्हात्रे, आदेश नारायण घरत, संतोष रामदास गाताडे, मारुती नामदेव घरत, आनंद कोंडिलकर, विनायक नारायण शिसवे, पत्रकार राकेश खराडे, पत्रकार अशोक घरत तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे खरेदी करूनही गाडीचे लोकार्पण तात्काळ करता आले नव्हते. प्रशासनाच्या नियमांचे पालन करत ग्रामपंचायत समितीने संयम बाळगला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आचारसंहितेचे निर्बंध हटताच हा लोकार्पण सोहळा पार पडला.
गावातील घरोघरी निर्माण होणारा ओला व सुका कचरा वेळेवर व योग्य पद्धतीने संकलित व्हावा, गाव स्वच्छ, सुंदर व निरोगी राहावे, या उद्देशाने ही नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे. “स्वच्छ गाव – सुंदर गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे संयुक्त सहकार्य आवश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. ग्रामस्थांनी ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन करण्यात आले.
लोकार्पणानंतर ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांचे शाब्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदा अतुल घरत यांचा माजी उपसरपंच सौ. सविता कैलास म्हात्रे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाहतूक विभाग अध्यक्ष अतुल मारुती घरत यांचा ‘शेकाप’चे खजिनदार कैलास गोपाळ म्हात्रे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक घरत यांनी केले. कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
