रायगड लोकधारा वृत्तसेवा :
२३ / ०२ / २०२६ |
रायगड लोकधारा प्रतिनिधी l लोणावळा : खंडाळा बोरघाटातील अमृतांजन पूल परिसरात आज सकाळी संभाव्य भीषण अपघात दुर्घटना थोडक्यात टळली. कोचीहून गुजरातकडे २१ टन क्षमतेचा प्रोपिलीन (Propylene) गॅस वाहून नेणारा टँकर (क्र. NL.01 AF.5040) सकाळी सुमारे 10.00 वाजता बोरघाटातील तीव्र उतारावर येत असताना त्याचे ब्रेक अचानक निकामी झाले. समोर धोकादायक वळणे आणि खोल दरी असल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला जाणीवपूर्वक धडक दिली. त्यामुळे टँकर जागीच थांबला आणि संभाव्य स्फोट अथवा गॅसगळतीसारखी गंभीर दुर्घटना टळली. या धाडसी निर्णयामुळे मोठी जीवितहानी आणि पर्यावरणीय नुकसान होण्यापासून बचाव झाला.
सुरक्षा यंत्रणांची तातडीची धाव…
घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, आयआरबीची पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणेची अग्निशमन दल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तसेच हेल्प फाउंडेशनची आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली.
हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती, अंतर्गत दाब आणि गळतीचा संभाव्य धोका यांची बारकाईने तपासणी केली. सुदैवाने कोणतीही गॅसगळती आढळून आली नाही.
दोन किलोमीटर अंतरावर हलविण्यात आला टँकर…
क्रेन आणि पुलरच्या सहाय्याने टँकर अपघातस्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मोकळ्या जागेत सुरक्षितपणे हलविण्यात आला. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि महामार्ग वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. आरटीओ अधिकारी रावते यांनी वाहनाची तांत्रिक तपासणी केली असून, खोपोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, टँकर ओढणारे वाहन पूर्णतः निकामी झाले असून, दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने टँकर पुढील प्रवासासाठी गुजरातकडे रवाना करण्यात येणार आहे.
सलग दुर्घटनांमुळे चिंता वाढली
अलिकडच्या काही दिवसांत प्रोपिलीन गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सलग दुर्घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बोरघाटासारख्या तीव्र उताराच्या घाटरस्त्यावर ब्रेक फेल झाल्यास भीषण स्फोट, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि पर्यावरणीय हानी होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर धोकादायक रसायने वाहून नेणाऱ्या वाहनांची कडक तपासणी, नियमित फिटनेस चाचण्या, चालकांचे विशेष प्रशिक्षण आणि संबंधित कंपन्यांनी अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
