रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण प्रतिनिधी / विठ्ठल ममताबादे : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी ओम शेखर देशमुख याच्या लंडन येथील उच्च शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. त्याने ती सार्थ ठरविली आहे. त्याने एम. एसस्सी. इंटरनॅशनल बिझनेस ही पदवी डिस्टिंक्शनमध्ये लंडनमध्ये मिळविली आहे. सोमवारी (ता. २३) लंडन येथे झालेल्या भव्यदिव्य दीक्षांत समारंभात त्याने प्रो. कुलगुरू (शिक्षण आणि विद्यार्थी यश) डॉ. चार्मेन बार्न्स यांच्या हस्ते पदवी स्वीकारली. त्यामुळे गव्हाण येथील ओम देशमुख हा लंडनला उच्चशिक्षण घेणारा पहिला तरुण ठरला आहे. 
आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे सध्या जगातील सातव्या खंडाच्या अंटार्टिकाच्या प्रवासात आहेत. त्यांनी अंटार्टिकावरून ओमचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. तसेच महेंद्रशेठ अंटार्टिका येथे असल्यामुळे त्यांचे पुत्र कुणालशेठ घरत लंडन येथे ओम देशमुख याच्यासोबत पदवीदान समारंभाला उपस्थित होते. त्यांनीही ओम देशमुखचे अभिनंदन केले आहे.
अंटार्टिकावरून दूरध्वनीवरून बोलताना महेंद्रशेठ म्हणाले, “ओम देशमुख हा मितभाषी आहे. त्याने लंडनला भात आणि पाव खाऊन दिवस काढले होते, पण आज त्याने पदवी संपदान केली. याचा मला अत्यानंद आहे. त्याचे मनापासून अभिनंदन.”
लंडनवरून ओम देशमुख दूरध्वनीवरून बोलताना म्हणाला, “मी लंडनला जाण्यास नाखूश होतो, पण महेंद्रशेठ घरत साहेबांनी माझी मानसिक तयारी करून घेतली, ते मला त्यावेळी भेटायला लंडनलाही येत असत. त्यांनी मला काहीही कमी पडू दिले नव्हते. सध्या ते अंटार्टिकाला आहेत; परंतु पदवीदान समारंभाला लंडनला जाण्यासाठी सर्व सहकार्य केले आहे. सोबत कुणालशेठ आहेत. त्यांचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.”
