Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : शहरातील बेरोजगार युवक-युवतींना कौशल्याधारित मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पनवेलमध्ये लवकरच मोफत प्रशिक्षण व नोकरी संधी केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. या उपक्रमासाठी नगरसेविका डॉ. अस्मिता जगदिश घरत यांनी पुढाकार घेत सक्रिय भूमिका बजावली आहे.
लाईटहाऊस संस्थाचे मुंबई विभाग क्लस्टर हेड निलेश पाटील आणि कार्यकर्ते श्री. आवळेसर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत डॉ. अस्मिता घरत यांची भेट घेतली. या बैठकीत प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून युवक-युवतींना विविध रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. संबंधित प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करत डॉ. घरत यांनी तात्काळ पुढील कार्यवाही सुरू केली. त्याच दिवशी त्यांनी पनवेल महानगरपालिकाचे महापौर नितीन पाटील तसेच माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान प्रकल्पासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर डॉ. अस्मिता घरत यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. आयुक्तांनीही या प्रस्तावाची दखल घेत शिक्षण विभागाला योग्य जागेची पाहणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. एका दिवसात सलग तीन महत्त्वपूर्ण बैठका घेऊन या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न डॉ. अस्मिता घरत यांनी केला आहे. लवकरच या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन शहरातील बेरोजगार युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास लाईटहाऊस संस्थेचे मुंबई विभाग क्लस्टर हेड निलेश पाटील आणि श्री. आवळेसर यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे आणि पुढाकार घेणाऱ्या नगरसेविका डॉ. अस्मिता जगदिश घरत यांचे विशेष आभार मानले आहेत.
