रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / महाड : महाड-बिरवाडी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कामगार संघटनेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचा झंझावात पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टी कामगार संघटनेचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष श्री. नागेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश नागले, सागर पवार, यश गायकवाड, दिलीप सोंडकर, संदीप ढेबे आणि गणेश खराडे यांनी अधिकृतरीत्या भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.



या पक्षप्रवेश सोहळ्याला स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जात असल्याचे यावेळी बोलताना अनेकांनी नमूद केले. श्री. नागेश देशमुख यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून सामान्य कामगार, कष्टकरी आणि युवकांच्या हक्कांसाठी लढणारा परिवार आहे. महाड-बिरवाडी परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.”
नवीन प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनीही भाजपच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाड तालुक्यातील राजकीय समीकरणांवर या पक्षप्रवेशाचा निश्चितच परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू आहे. कामगार वर्गात वाढता प्रतिसाद आणि युवकांचा वाढता सहभाग पाहता आगामी काळात भाजपची ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यामुळे महाड-बिरवाडी परिसरात भाजप कामगार संघटनेला नवे बळ मिळाले असून स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
