रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : पनवेल येथील डॉ. पिल्लई ग्लोबल ॲकडमी येथे जागर मराठीचा साजरा करत मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. मराठीची समृद्ध परंपरा, साहित्य, संतवाङ्मयाची शिकवण आणि भाषेचे वैभव विद्यार्थ्यांनी सुंदरपणे मांडले.
या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच विद्यालयाच्या व्यवस्थापक मेबल चॅन पिल्लई, मुख्याध्यापक प्रकाश नायर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मराठी भाषेचे महत्त्व सांगण्यासाठी सुविचार लेखन, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा, आणि निबंध स्पर्धा यांसारखे विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात, ज्यातून विद्यार्थ्यांना मराठी संस्कृती व भाषेची गोडी लावली जाते.मराठी भाषा गौरव दिन राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा अभिमान वाटावा असा हा दिवस… मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर सर्व सीमा ओलांडून सातासमुद्रापारही गेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. तसेच मराठी जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.डॉ. पिल्लई ग्लोबल ॲकडमी मद्धे सर्व जाती धर्म आणि विविध भाषेचे विदयार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या कार्यक्रमात भारताच्या अखंडपणाचे दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी सादर केलेला अभंग भक्तिमय वातावरणात घेऊन गेला. त्यानंतर संतांच्या शिकवणीवर आधारित एक प्रभावी नाट्यप्रस्तुती सादर करण्यात आली. संतवाङ्मयातील मूल्ये, प्रेम, करुणा आणि समाजभान यांचा संदेश विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयातून मांडला.संपूर्ण कार्यक्रम संतांच्या विचारांवर आधारित असल्याने प्रेक्षकांना मनोभावे बांधून ठेवण्यात तो यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि उपस्थित मान्यवरांचे प्रोत्साहन यांमुळे मराठी भाषा गौरव दिनाचा हा सुंदर उपक्रम अविस्मरणीय ठरला.
