रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण : आपटा फाटा येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा; ‘स्वामी श्रेय’ वृद्धाश्रमाचेही लोकार्पण..! “जगी जन्म-मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा !”
अनंतकोटी ब्रह्मांडनायक, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पवित्र प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी वंदन..!
श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र, आपटा फाटा येथे शुक्रवार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगल दिनाचे औचित्य साधून मठाच्या परिसरात नूतन ‘स्वामी श्रेय’ वृद्धाश्रमाचे लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल :
प्रकट दिनानिमित्त पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे स्वामींची काकड आरती झाल्यानंतर सकाळी ८ ते १० या वेळेत लघुरुद्र पूजा करण्यात आली. सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रीमती अंजलीताई कवळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांच्या रसाळ वाणीतून स्वामींच्या लीलेचे वर्णन ऐकून भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. सायंकाळी स्वामींच्या पालखी सोहळ्याने या उत्सवाची सांगता झाली. ’स्वामी श्रेय’ वृद्धाश्रमाचे उद्घाटन अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीची सांगड घालत, आपटा येथील स्वामी मठात आता ‘स्वामी श्रेय’ वृद्धाश्रम कार्यान्वित झाला आहे. निसर्गरम्य वातावरण आणि अध्यात्मिक शांती असलेल्या या ठिकाणी वृद्धांना हक्काचा आधार मिळणार आहे. या आश्रमाचे उद्घाटन स्वामी समर्थ मठाचे मुख्य ट्रस्टी श्री.ओमप्रकाश परांजपे व अन्य विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ‘स्वामी श्रेय’ वृद्धाश्रमाचे संस्थापक श्री. शॉन पिल्लई आणि श्रीमती मेघा देसाई मॅडम यादेखील उपस्थित होत्या. दीप प्रज्वलन आणि फीत कापून वृद्धाश्रमाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. भाविकांची अलोट गर्दी: या सोहळ्यासाठी आपटा खारपाडा, जिते, डोळघर, साई परिसरासह लांबूनही स्वामी भक्तांनी हजेरी लावली होती. दिवसभरात सुमारे दोन ते तीन हजार भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले. मठाचे व्यवस्थापक श्री.प्रदीप मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. अध्यात्मासोबतच समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेला हा सेवा प्रकल्प परिसरासाठी भूषणावह ठरणार आहे. सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी आपल्या कुटुंबियांसोबत श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी मुलगी कु.ओवी घरत,धर्मपत्नी सौ.मयुरी घरत, कु.दिव्या, मित्र शरद पाटील स्वामींच्या मठात उपस्थित होते.
