रायगड लोकधारा वृत्तसेवा :
विद्यार्थिनीसोबत ‘नको ते वर्तन’ केल्याचाही खळबळजनक आरोप…
शिक्षकच भक्षक व लाचखोर निघाले तर जायचे कुठे ? पालकांचा सवाल…
पनवेल प्रतिनिधी / आदित्य वाघ : पनवेल जवळील शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेजमध्ये उपप्राचार्याने विद्यार्थिनीकडे लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनुत्तीर्ण विषय म्हणजेच ATKT परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी प्रति विषय ६,००० रुपये मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यासोबतच विद्यार्थिनीसोबत अयोग्य वर्तन केल्याचाही खळबळजनक आरोप पुढे आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थिनी विधी शाखेच्या म्हणजेच LLBच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. संबंधित उपप्राचार्यांनी तिला गाठून विषय क्लिअर करून देतो असे आमिष दाखवत प्रति विषय ६,००० रुपयांची मागणी केली. याबरोबरच त्यांनी वैयक्तिक स्तरावर अनुचित संवाद साधून मर्यादा ओलांडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले. उपप्राचार्यांनी विद्यार्थिनीला खोपोली येथे बीकानेर स्वीट्स परिसरातून पुढे एका ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून, तो या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरत आहे.
दरम्यान, विद्यार्थिनीने याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली असता, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर तिने पोलिसांकडे धाव घेत उपप्राचार्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, शिक्षकच भक्षक आणि लाचखोर झाले तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर ? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
