रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : सन्माननीय ह.भ.प. विक्रम महाराज थोरवे यांना “आदर्श कीर्तनकार” या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले, ही निश्चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना आहे.
वारकरी संप्रदायाची पवित्र पताका खांद्यावर घेऊन, कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अखंडपणे आणि निष्ठेने करत, समाजाला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि स्फूर्ती देण्याचा जो आदर्श मार्ग आपण अवलंबला आहे, तो खरोखरच अनुकरणीय आहे. आपल्या या महान कार्याची दखल घेऊन पत्रकार उत्कर्ष समितीने आपणास या गौरवचिन्हाने सन्मानित केले, याचा आम्हालाही मनापासून आनंद होत आहे.
हा पुरस्कार सोहळा पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात पार पडला. “आदर्श कीर्तनकार” हा पुरस्कार जाहीर होताच, ह.भ.प. विक्रम महाराज थोरवे आपल्या जन्मदात्री माऊली हिराबाई जनार्दन थोरवे, आणि संपूर्ण कुटुंबियांसह स्टेजवर सन्मान स्वीकारण्यासाठी आले.
त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, समाधान आणि अभिमान प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेला…
सन्मान स्वीकारल्यानंतर नाट्यगृहाबाहेर दुसऱ्या मजल्यावर संपूर्ण परिवाराने एकत्र येऊन आनंदाचे क्षण टिपताना पाहून, मीही क्षणाचाही विलंब न करता त्या आनंदाला कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले की, पुरस्कार कोणताही असो, तो मिळाल्याचा आनंद हा शब्दांत मांडता येणार नाही इतका खास आणि हृदयस्पर्शी असतो.
वारकरी संप्रदायाची एक वेगळीच ओळख असते.“नामात रमणारे, साधेपणात जगणारे आणि भक्तीतून समाजाला मार्गदर्शन करणारे”
संतांच्या विचारांची परंपरा पुढे नेणारे हे कीर्तनकार खऱ्या अर्थाने समाजाचे दीपस्तंभ आहेत.
“राम कृष्ण हरी” या नामस्मरणातून जे समाधान आणि एकात्मता मिळते, तीच भावना त्या संपूर्ण वातावरणात अनुभवायला मिळाली…
फोटो काढताना मीही मनोमन “राम कृष्ण हरी” म्हणत तो क्षण अनुभवला…. आणि निघताना त्या सर्वांच्या मुखातून एकसुरात उमटलेले “राम कृष्ण हरी” हे शब्द वातावरण अधिकच पवित्र करून गेले. त्या मंगल ध्वनीतच मीही त्यांचा निरोप घेतला.
काही काव्यत्मक ओळी….👇
पताका वारकरी धर्माची, खांद्यावरती उंचावली कीर्तनाच्या सुरातून, समाजजागृती फुलवली, विक्रम महाराजांच्या वाणीतून, संतांची वाणी झंकारली, “राम कृष्ण हरी” म्हणत
भक्तीची गंगा अवतरली, साधेपणात मोठेपण, हेच वारकऱ्यांचे धन, भक्तीतून उभा राहतो, समाजाचा खरा जीवन, माऊलीच्या चरणी, ठेवून साऱ्या भावना, कीर्तनातून घडते जीवन, हीच खरी साधना, स्टेजवर सन्मान, डोळ्यांत आनंदाचा सागर, कुटुंबियांसह उभा तो क्षण, जणू पवित्र उत्सव साकार, नामात आहे शक्ती, नामातच समाधान, कीर्तनातूनच घडते, समाजाचे खरे कल्याण, “राम कृष्ण हरी” या मंत्रात, दडले जीवन सार, वारकरी परंपरेचा हा अमोल ठेवा अपार…
लेखन : अशोक ना.घरत.(कवी पत्रकार) कोन-पनवेल.
सोमवार दि.११/०५/२०२६.


