रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल / कळंबोली : कळंबोली परिसरात आज एक थरारक घटना घडली असून, पोलिसांच्या सतर्कता आणि धाडसामुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. रोडपाली येथील गणपती विसर्जन तलावात एका महिलेने आत्महत्येच्या उद्देशाने उडी मारल्याची माहिती कंट्रोल रूममार्फत मिळताच कळंबोली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आज दिनांक १० मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास बीट मार्शल १ च्या एम.डी.टी. वर संदेश प्राप्त झाला की, रोडपाली गणपती विसर्जन तलावात एक महिला बुडत असून तातडीने पोलिस मदतीची आवश्यकता आहे.
सदर माहिती मिळताच पोलीस शिपाई क्रमांक १२३३६ आकाश वानखेडे आणि पोलीस शिपाई क्रमांक ४३४९ सागर माळी हे अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. तलावात महिला बुडत असल्याचे लक्षात येताच पोलीस शिपाई सागर माळी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेतली आणि महिलेला सुखरूप बाहेर काढले.
यानंतर संबंधित महिलेला तात्काळ आशा हॉस्पिटल येथे पोलिस वाहनातून उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी महिलेला एमजीएम हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले आहे.
सदर महिलेचे नाव अनिता बालाजी नांदे (वय ३५, रा. कळंबोली) असे असून ती काहीशी मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
या धाडसी आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या कामगिरीमुळे कळंबोली पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेषतः पोलीस शिपाई सागर माळी यांच्या धाडसाला नागरिकांकडून सलाम केला जात आहे.
“पोलिसांचा देवदूत अवतार! तलावात उडी मारून महिलेला दिलं जीवदान”
