रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पनवेल : पनवेल तहसील कार्यालयात कार्यरत असलेले मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांना तब्बल ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे पनवेल तहसील कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी गोवर्धन माने यांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर ACBच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोवर्धन माने यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईनंतर पनवेल तहसील कार्यालय परिसरात मोठी चर्चा रंगली होती. महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. ACBच्या अधिकाऱ्यांनी आरोपी अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली असून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असताना काही अधिकारी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत ACBच्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोठा इशारा मिळाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
“शासकीय कार्यालयात कामासाठी लाच देण्याची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
या प्रकरणामुळे पनवेल महसूल विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
