रायगड लोकधारा वृत्तसेवा :
गुजरात सुरेंद्रनगर : गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि निघृण हत्याकांड उघडकीस आले आहे. ५० वर्षीय जागृती गोस्वामी हिने आपल्या अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कट तिने तब्बल चार प्रियकरांच्या मदतीने रचल्याचा खुलासा अहमदाबाद क्राईम ब्रँचच्या तपासातून झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जागृती गोस्वामी हिचे पहिले लग्न सुखदेवगिरी गोस्वामी यांच्यासोबत झाले होते. मात्र नंतर तिचे स्वतःच्या दिरासोबत म्हणजेच शांतीगिरी गोस्वामी यांच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. तिने पहिला पती आणि मुलांना सोडून शांतीगिरीसोबत पळ काढला आणि दोघे सुरेंद्रनगरमध्ये राहत होते.
शांतीगिरी हे ट्रक ड्रायव्हर असल्याने अनेक दिवस घराबाहेर असायचे. याच काळात जागृतीचे शेजारी राहणाऱ्या कांतिलाल उर्फ भरत साबरिया याच्याशी संबंध निर्माण झाले. या संबंधांत पती अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला युनिस नावाच्या एका गुंडाला २५ हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. मात्र तो घरात शिरल्यानंतर घाबरला आणि झोपलेल्या शांतीगिरीचा फोटो काढून “काम झाले” असे खोटे सांगत पैसे घेऊन फरार झाला.
दुसऱ्या दिवशी शांतीगिरी जिवंत असल्याचे पाहून जागृती आणि कांतिलाल हादरले. अखेर त्यांनी स्वतःच हत्या करण्याचा निर्णय घेतला. शांतीगिरी झोपेत असताना कांतिलालने त्याचा गळा दाबला, तर जागृतीने त्याच्या चेहऱ्यावर उशी दाबून त्याची हत्या केली.
यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अन्य साथीदारांच्या मदतीने मृतदेह कालव्यात फेकण्यात आला आणि हा अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करण्यात आला. हे प्रकरण जवळपास आठ महिने दडपून ठेवण्यात आले होते. मात्र अहमदाबाद क्राईम ब्रँचने सखोल तपास करत या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला आणि आरोपींना अटक केली.
