रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जांभारी परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात संशयास्पद वस्तूचा अचानक स्फोट झाला. या भीषण स्फोटात महिलेचा हात गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔴 रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५, रा. जांभारी फाटा) या सकाळच्या सुमारास जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना जमिनीवर संशयास्पद वस्तू दिसली. ती हातात उचलताच अचानक जोरदार स्फोट झाला.
🔴 स्फोट इतका भीषण होता की त्यांच्या हाताची बोटे तुटून गंभीर भाजल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. जखमी महिलेला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याची तयारी सुरू आहे.
🔴 दरम्यान, घटनास्थळी पोलीस व बॉम्बशोधक पथक दाखल झाले असता परिसरातून तब्बल २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले. त्यामुळे या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कोणी आणि कशासाठी ठेवली होती, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
🔴 संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला असून बॉम्बशोधक पथक, श्वानपथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत.
🔴 जांभारी परिसरात सध्या भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
