रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण प्रतिनिधी / विठ्ठल ममताबादे : लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे शुक्रवारी (ता. २९) ‘कृतज्ञता सोहळा’ एम. जी. ग्रुपतर्फे दणक्यात साजरा करण्यात आला. रामशेठ हे सुप्रसिद्ध उद्योजक असल्याने त्यांचा भव्य सत्कार बांधकाम व्यावसायातील डेल्टा ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन गाजीपारा, टुडे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर ब्रदेशभाई शहा, सोनाली रिएलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर मयुरेश चौधरी यांच्या हस्ते एम. जी. ग्रुपचे प्रमुख महेंद्रशेठ घरत यांनी करून दाखवला. यावेळी रामशेठ ठाकूर यांना गुरू समजून आयुष्याची वाटचाल करणारे महेंद्रशेठ घरत यांनी गुरुदक्षिणा म्हणून रोलॅक्सचे अनोखे घड्याळ भेट दिले आणि गुरु-शिष्याचे नाते अनोखे असते हे दाखवून दिले.

सत्काराला उत्तर देताना माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “महेंद्रशेठ यांनी दातृत्वाचा वसा माझ्याकडून घेतला आहे; परंतु तो एक पाऊल पुढे जाऊन माझ्यापेक्षा वेगळे समाजोपयोगी काम करतोय. घरे, बंगले, गाड्या आपल्या सहकाऱ्यांना देऊन त्यांचेही आयुष्य उजळत आहे. जे मलाही जमले नाही. ‘सुखकर्ता’ बंगल्यावरून दिनदुबळ्यांची, गरजवंतांची तो ज्या पद्धतीने सेवा करतोय, याचा मला रास्त अभिमान आहे. त्याने आज कामगार क्षेत्रात जागतिक पातळीवर आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. बैठका व पर्यटनाच्या माध्यमातून त्याने संपूर्ण जग पालथे घातले आहे. हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे राजकारणात आमचे प्रवाह वेगळे आहेत, पण नातेसंबंधांत ते कधीही आडवे येणार नाहीत, याची काळजी आम्ही दोघांनीही घेतली आहे.”
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत रामशेठ ठाकूर यांच्या जुन्या आठवणींत रमले होते. ते म्हणाले, “रामशेठ ठाकूर हे शेलघरचे जावई आहेत. दिवंगत ज. आ. भगत साहेबांची कन्या शकुंतलाताई त्यांच्या सहचारिणी आहेत. त्यामुळे शेलघर गावावर त्यांचे विशेष प्रेम आहे. भगत साहेबांच्या ओसरीत असलेला रामशेठ ठाकूर साहेबांचा फोटो पाहत मी मोठा झालो. पुढे ते शिक्षक झाले, तेव्हा ते वाशीला राहत होते. त्यावेळी मी त्यांच्या घरी बीएमटीसीने जायचो. प्रशांत आणि परेशही तेव्हा लहान होते. त्यामुळे छान गप्पागोष्टी रंगायच्या. रामशेठ यांनी एकदा आम्हाला चेंबूरला चित्रपट पाहायलाही नेले होते, अशी आठवणही महेंद्रशेठ यांनी यावेळी सांगितली. गेल्या ५० वर्षांपासून त्यांना मी पाहत आलोय. त्यांनी मला अक्षरशः हाताला बोट धरून राजकारणात आणले. माझ्या आजच्या वाटचालीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे ऋण माझ्यावर आहेत. ते सर्वच बाबतीत मोठे आहेत, पण आजही माझे ऐकतात. त्यामुळे राजकीय वादळे कितीही आली तरी आमचे कौटुंबिक संबंध कायमच मधुर राहतील,” असा विश्वासही महेंद्रशेठ घरत यांनी बोलून दाखवला. सध्या मी कामगारांच्या हक्कांच्या लढाईसाठी पूर्वनियोजित बैठकांसाठी जिनिव्हाच्या दौऱ्यावर जात आहे. त्यामुळे २ जून या रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवशी मी प्रत्यक्ष भारतात नाही. त्यामुळे त्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे.
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या ‘सुखकर्ता’ विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महेंद्रशेठ घरत जिनिव्हा दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या तीन सहकाऱ्यांना फोर व्हीलर भेट दिल्या. त्यांच्या चाव्या रामशेठ ठाकूर, उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या हस्ते दिल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर महेंद्रशेठ घरत यांनी हास्य फुलविले. नाना गडकरी यांनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ऍड . अविनाश ठाकूर, मो. का. मढवी गुरुजी आणि घरत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
