
🔴 रायगड एलसीबीचा गुटखा माफियांवर धडक प्रहार; पनवेल मधील भोकरपाडा येथे रु.८८,९६८ चा प्रतिबंधित विमल गुटखा जप्त…
पनवेल प्रतिनिधी l श्रीनाथ लाड : रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करत पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील एका किराणा दुकानावर धाड टाकून ₹८८,९६८ किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला (गुटखा) जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी एलसीबीचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भोकरपाडा येथील एका किराणा दुकानावर छापा टाकला. कारवाईदरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेला केशरयुक्त विमल पान मसाला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ ₹८८,९६८ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी नितेश ज्ञानेश्वर पाटील (वय ३०, रा. भोकरपाडा, ता. पनवेल) आणि दिनेश मकीजा (रा. बदलापूर) यांच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि संबंधित नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार रवी मुंडे, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे तसेच पोलीस शिपाई प्रदीप खरात यांनी सहभाग घेतला.
कारवाईनंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटख्याची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात रायगड एलसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या धडक कारवाईतून स्पष्ट झाले असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
