रायगड लोकधारा वृत्तसेवा :
उरण, रायगड : जासईत सध्या ‘माती खोदो, पैसा ओढो’ योजना जोरात सुरू आहे, आणि या योजनेचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ आहेत स्थानिक माती माफिया! दादर पाडा गावाजवळ, बस स्टँडच्या पुढे बियर शॉपजवळ टाकलेल्या मातीच्या भरावात थेट मानवी कवटी सापडल्याने आता या ‘योजनेला’ हॉरर शोचा तडका मिळालाय. डेब्रिजच्या ढिगाऱ्यात ‘मिस्टर खोपडी’ हसत पडलेत, पण प्रशासन मात्र ‘आम्हाला काय त्याचे’ मोडमध्ये आहे. म्हणजे माणसाची कवटी सापडते, पण साहेबांची कवटी हलतच नाही, याला म्हणतात ‘प्रशासकीय शांतता’ !
हा भराव मुंबईहून आलेल्या डेब्रिजचा आहे की जासईच्या डोंगरांचा ‘पोस्टमार्टम’ करून आणलेल्या मातीचा, याचा तपास ‘सीआयडी’ला लावावा लागेल. कारण जासईचे डोंगर तर माती माफियांनी असे पोखरलेत की आता त्यांना ‘खड्डा योजना’ अवॉर्ड द्यायला हवा. ‘डोंगर फोडू, नोटा जोडू’ हा यांचा नवा मंत्र आहे. आता या मातीत कवटी सापडली, उद्या हात-पाय सापडले तरी नवल नाही. कारण ‘माती’च्या धंद्यात ‘माणुसकी’ गाडली गेलीय.
आता ‘हप्ता पुराण’ ऐका. स्थानिक ‘शुभचिंतक’ सांगतात की जासईतून रोज 1500 डंपर माती पळवली जाते आणि प्रत्येक डंपरमागे 1000 रुपयांचा ‘प्रसाद’ वाटला जातो. म्हणजे दिवसाला 15 लाख! अहो, एवढ्या पैशात तर रोज एक छोटा ‘आयपीएल’ भरेल. एवढा ‘धंदा’ दिवसा-ढवळ्या सुरू आहे, तरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आणि गोपनीय शाखा ‘कुठे नेऊन ठेवली आहे निजेला, तनाला’ हे गाणं गुणगुणत बसलेत का? की यांच्या डोळ्यावर 1000 रुपयांच्या नोटांचं ‘चष्मा’ आहे? माती माफिया आणि साहेब लोकांची ही ‘जोडी नं 1’ नसती तर 1500 डंपर हवेतून उडाले असते का?
उरणच्या तहसीलदार साहेबांची तर गोष्टच न्यारी. जासईत डोंगर फोडले जातात, शेतजमिनींचा ‘कीमा’ केला जातो, पर्यावरणाची ‘आई-माई’ एक केली जाते, आणि आता तर भरावात कवटी सापडते, तरी साहेब ‘मौनी बाबा’ बनून बसलेत. साहेब, डंपरच्या कलेक्शनवर नजर असते, मग कवटीवर नजर का जात नाही? की ‘कलेक्शन’ दिसतं, ‘कलेवर’ दिसत नाही? कायद्याचे रक्षक जर ‘हप्ता घेऊन’ रस्त्यावर उभे राहिले, तर माफिया ‘माती’ नाही तर अख्खा तालुका विकून खातील.
म्हणूनच जनतेची ‘विनोदी पण कडक’ मागणी आहे – या कवटीचा ‘आधार कार्ड’ शोधा आणि ती कोणाची आहे ते सांगा. जासईतील माती माफियांवर ‘एमपीडीए’ लावा, म्हणजे ‘माती पळवा डंपर असोसिएशन’ नाही. दिवसाला 15 लाख कमावणाऱ्या या ‘धन्वंतरी’ टोळीचा ‘गॉडफादर’ कोण, हे शोधायला एसआयटी नेमा. आणि हो, ज्यांच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे, त्या पोलीस आणि महसूलच्या ‘महानुभावांवर’ पण कारवाई करा. नाहीतर उद्या या भरावात आणखी कवट्या सापडतील आणि प्रशासन म्हणेल, ‘आम्ही काय संग्रहालय उघडलंय का?’
