रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था संचलित, चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील लेखा व वित्त (Accounting & Finance) विभागामार्फत तृतीय वर्ष (लेखा व वित्त) विद्यार्थ्यांसाठी दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत ही भेट उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
विद्यार्थ्यांनी प्रथम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) येथे भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना शेअर बाजाराचा इतिहास, व्यवहार प्रणाली, निर्देशांक, डिमॅट खाते, ऑनलाईन ट्रेडिंग प्रक्रिया तसेच गुंतवणूकदार संरक्षण उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना शेअर बाजाराची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय येथे भेट देऊन भारतीय चलनव्यवस्थेचा इतिहास, प्राचीन नाणी व नोटांचा संग्रह, चलननिर्मिती प्रक्रिया तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेची मौद्रिक भूमिका याविषयी माहिती घेतली. डिजिटल गॅलरी व माहितीपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक समृद्ध झाले.
या शैक्षणिक भेटीचे नेतृत्व विभागप्रमुख डॉ. निलेश कोळी यांनी केले. तसेच सहाय्यक प्राध्यापक श्री. मनोज सुपेकर, कु. मोनिका भालेराव व श्री. आलोक भानुशाली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांच्या योग्य नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजल्या तसेच वित्तीय क्षेत्राविषयीची जाणीव व आत्मविश्वास वाढला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात अशा अधिक शैक्षणिक भेटी आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन श्री. रामशेठ ठाकूर साहेब तसेच संस्थेचे सचिव एस . टी .गडदे सर आणि प्राचार्य प्राध्यापक (डॉ .) एस. के .पाटील याचे मार्गदर्शन लाभले .
प्राचार्य : प्रो.(डॉ.) एस.के.पाटील. चांगु काना ठाकुर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त
