रायगड लोकधारा वृत्तसेवा :
दिनांक : ०४ जून २०२६
पनवेल प्रतिनिधी आदित्य वाघ : डेरवली गावाचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर रामचंद्र पाटील यांचे गुरुवारी (दि. ४ जून) आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच डेरवली परिसरासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मधुकर पाटील यांनी उपसरपंच म्हणून कार्यरत असताना गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच तत्पर राहून लोकहिताची भूमिका घेत असत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि समाजाभिमुख कार्यामुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. कोणत्याही व्यक्तीच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती असल्याने त्यांच्याबद्दल सर्व स्तरांत आदराची भावना होती. त्यांच्या अकाली निधनामुळे गावाने एक कर्तव्यदक्ष,
लोकाभिमुख आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेतृत्वगुण असलेला व्यक्ती गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मधुकर पाटील यांच्यावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
त्यांच्या निधनाने डेरवली गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
