रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या फॅशन अँड अपॅरल डिझाईन विभागामार्फत दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक “निर्मिती फॅशन शो” उत्साहात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमामध्ये सर्जनशीलता, संस्कृती आणि नाविन्य यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. भारतातील विविध आदिवासी जमातींची समृद्ध परंपरा आकर्षक आणि रंगतदार पोशाखांद्वारे प्रभावीपणे सादर करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी खासदार तथा जे.बी.एस.पी. संस्थेचे अध्यक्ष लोकनेते मा. श्री रामशेठ ठाकूर, तसेच जे.बी.एस.पी. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री वाय. टी. देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
या फॅशन शोमध्ये भारतातील विविध आदिवासी संकल्पनांवर आधारित थीम्स अत्यंत कल्पकतेने आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सादर करण्यात आल्या. एस.वाय.बी.एस्सी. आणि टी.वाय.बी.एस्सी. फॅशन अँड अपॅरल डिझाईन विभागातील विद्यार्थ्यांनी विविध जमातींचा सखोल अभ्यास करून त्यांच्या पारंपरिक घटकांना आधुनिक आणि बाजारपेठेस अनुरूप डिझाईन्समध्ये रूपांतरित केले. त्यांच्या मेहनतीचे आणि संशोधनाचे प्रतिबिंब रॅम्पवर स्पष्टपणे दिसून आले.
या कार्यक्रमाच्या परीक्षक म्हणून मुंबईस्थित सेतू ग्राम संस्थेच्या संस्थापक सौ. निधी गोयल उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि पोशाखांच्या संकल्पनांचे कौतुक करत डिझाईन्स अत्यंत विचारपूर्वक आणि प्रभावी पद्धतीने मांडल्याचे सांगितले. तसेच भविष्यात आपल्या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
मा. श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले व फॅशन अँड अपॅरल डिझाईन विभागाचा उज्ज्वल भविष्यकाळ असल्याचे नमूद केले. त्यांनी प्राध्यापकवर्ग व व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विज्ञान शाखेचे प्रभारी डॉ. जे. एस. ठाकूर यांच्या वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागप्रमुख श्री. आकाश पाटील यांनी प्रभावीपणे केले, तर कोरिओग्राफी मिस स्नेहा जाजू यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
यावेळी डॉ. बी. डी. आघाव (IQAC समन्वयक), प्रा. डॉ. एस. आय. उन्हाळे (परीक्षा नियंत्रक), डॉ. आर. व्ही. येवले (इंग्रजी विभागप्रमुख), श्री. गणेश जगताप (सांस्कृतिक विभाग समन्वयक) आणि श्री. एस. कांबळे (AI & ML तसेच CS & DF समन्वयक) यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फॅशन अँड अपॅरल डिझाईन विभागाच्या समन्वयक सौ. दीपश्री राठोड, पूर्णवेळ प्राध्यापिका सौ. निलीमा वाघ, सौ.नीलम किरदत आणि सौ. प्राजक्ता वराडकर यांचे विशेष कौतुक करण्यात आले. विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व मॉडेल्स महाविद्यालयातीलच विद्यार्थी होते आणि त्यांनी आत्मविश्वासाने सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
“निर्मिती फॅशन शो” अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला असून फॅशन अँड अपॅरल डिझाईन विभागासाठी हा आणखी एक मानाचा टप्पा ठरला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जाणीव वाढवण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
