रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / महाड : चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन आणि पुढल्या वर्षी येणारा शतक महोत्सवी वर्धापन दिन आंबेडकरी विचारांचे राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्रितपणे साजरा करावा अशी मागणी महाड येथील पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभाग सचिव मनोज खांबे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा जोगेंद्र कवाडे,भारतीय रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर,रिपब्लिकन पार्टी गवई गटाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांना पाठविले आहे.
या पत्रात श्री. खांबे यांनी नमूद केले आहे की, २० मार्च १९२७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. जात, धर्म आणि वर्णभेदाच्या विरोधात समान हक्कांसाठी झालेला हा सत्याग्रह जगभरात मानवतेचा संदेश देणारा ठरला.
सन २०२७ मध्ये चवदार तळे सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. २० मार्च 2026 पासून या शताब्दी वर्षास प्रारंभ होणार आहे. आजपर्यंत विविध आंबेडकरी संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष स्वतंत्र व्यासपीठांवर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे समाजात एकात्मतेचे चित्र दिसून येत नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर शतकमहोत्सवी वर्षाच्या सुरुवातीलाच हे चित्र बदलण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन “एक सभा – एक व्यासपीठ” या संकल्पनेतून कार्यक्रम आयोजित करावा, अशी भूमिका श्री. खांबे यांनी मांडली आहे. यामुळे आंबेडकरी समाजाची एकता देशासमोर येईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सर्व पक्ष, संघटना आणि संस्था यांना एकत्र आणण्याचे आवाहनही श्री. खांबे यांनी या सर्व आंबेडकरी नेत्यांना केले आहे.
