रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनिधी / सतिश पाटील / बदलापूर : शहरात वाढत्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी १ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती देत कुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्ष सौ. रुचिता राजन घोरपडे यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणासह मूक प्राण्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा कचऱ्यातील अन्न खाताना जनावरे नकळत प्लास्टिक ही खातात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अशा घटना वारंवार घडत असल्याने प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
याशिवाय शहरातील नदी-नाले आणि गटारांमध्ये प्लास्टिक पिशव्या साचल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. परिणामी पावसाळ्यात पाणी साचणे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. तसेच डंपिंग ग्राऊंडमध्येही प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सौ. रुचिता घोरपडे यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून बदलापूरकरांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
“पर्यावरणाचे संरक्षण ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावेत,” असे आवाहन नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी केले.
