रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कैलासराजे घरत / खारपाडा, पेण : खारपाडा गावातील शेतकऱ्यांनी पाणंद शेतरस्ता अतिक्रमण दूर करण्यासाठी गटविकास अधिकारी पेण सन्माननीय गजानन लेंडी साहेब आणि पंचायत समिती सभापती सन्मानीय स्मिता पाटील उपसभापती मा.संजय डंगर साहेब यांना प्रत्यक्षात भेटून लेखी निवेदन दिले. यावेळी गटविकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आश्र्वासित केले की आपण लवकरात लवकर याबाबत योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांचा पाणंद शेतरस्ता मोकळा करून देऊ. खारपाडा गावातील भगतनगर (हायवेपासून) ते घोटमालवाडीकडे जाणारा पाणंद शेतरस्ता हा वंशपरंपरागत पिढ्यानपिढ्या वडिलोपार्जित ब्रिटिशकालीन खूप जूना शेतरस्ता असून खारपाडा गावातील शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा हा एकमेव पाणंद शेतरस्ता असून या पाणंद शेतरस्त्यात सर्व्हे नंबर २८/३ मध्ये बळीराम पांडुरंग पाटील व त्याचे तिन्ही भाऊ धनाजी पांडुरंग पाटील, महादेव पांडुरंग पाटील, रामचंद्र पांडुरंग पाटील यांचे एकत्रित बेकायदा बांधकाम घर क्रमांक ५५९/१ ते ४ यांनी कोणत्याही प्रकारची शासनाची पूर्वपरवानगी न घेता बिनशेती न(NA )करता तसेच ग्रामपंचायतची बांधकाम परवानगी न घेता पाणंद शेतरस्त्यात नव्याने बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे पाणंद शेतरस्ता अतिशय अरुंद झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी लागणारे साहित्य ट्रॅक्टर, ट्रॉली, नांगर, खते, बी बियाणे, शेतीतून निघणारी उत्पादने भाजीपाला, आंबे, फणस, जांभूळ, काजू यांनी ने आण करण्यासाठी टेम्पो, ट्रक वाहतूक करण्यास मोठी अडचण निर्माण झाली असून त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली भातशेती लागवड करता आली नाही. या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी मिळून या विरोधात पेण तहसील कोर्टात ९/२०२५ या नावाने दावा दाखल केला होता त्याचा निकाल दिनांक ९/१/२०२६ रोजी शेतकऱ्यांच्या बाजूने लागला.मा तहसील कोर्ट यांनी अंतिम आदेश पारित करून संबंधित अतिक्रमण केलेले सामनेवाले यांना स्वतःच्या खर्चाने स्वतः अतिक्रमण दूर करावे. तसेच ग्राममहसूल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना संबंधित अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
आजपर्यंत २ महिने पूर्ण होऊन देखील संबंधित अतिक्रमणावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास गैरसोय होत आहे. तरी संबंधित पाणंद शेतरस्त्यावरील अतिक्रमणावर ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी. यावेळी पाणंद शेतरस्ता संघर्ष समिती खारपाडाचे शेतकरी हनुमान बाबू घरत, पत्रकार कैलासराजे घरत, कमलाकर बाबू घरत, प्रकाश धर्मा घरत, अविनाश धनाजी मोकल, राजाराम वामन पाटील, देविदास रामा घरत, कमलाकर हासुराम घरत, महिला शेतकरी सौ.वंदना देविदास घरत आणि इतर सर्व शेतकरी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
