रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलास राजे घरत / पेण : हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीचे , माध्यमिक विद्यामंदिर खारपाडा येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी ‘मैत्री, प्रेम आणि आकर्षण’ या अत्यंत संवेदनशील व समकालीन विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पेण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
किशोरवयीन अवस्थेत विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर मोठे बदल घडत असतात. या बदलांच्या प्रक्रियेत आकर्षण आणि खरे प्रेम यातील फरक न समजल्याने अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा आणि सकारात्मक विचारांची दिशा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून जगदीश डंगर व योगिता डंगर यांनी विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने चर्चा केली. त्यांनी मैत्री, आकर्षण आणि प्रेम यातील सूक्ष्म भेद सोप्या, प्रभावी आणि समजण्यासारख्या उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून आपल्या शंका मोकळेपणाने मांडल्या. या प्रसंगी रमाकांत घरत तसेच शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मजागरूकता वाढीस लागून योग्य निर्णयक्षमतेची जाणीव निर्माण झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरला, असे मतही व्यक्त करण्यात आले.
