रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / डोंबिवली : डोंबिवलीतील २० वर्षीय रितेश कोणका याचा खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे ट्रेकिंगदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मित्रांसोबत साहसाचा आनंद घेण्यासाठी गेलेला रितेश चढाई करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला आणि काळाने त्याच्यावर झडप घातली.मित्रांसोबत साहस अनुभवण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा प्रवास अर्ध्यावरच संपला..
रविवारी ११ मे रोजी रितेश आपल्या गिर्यारोहक मित्रांसोबत इरशाळवाडी येथे ट्रेकिंगसाठी गेला होता. चढाई सुरू असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली. मित्रांनी त्याला पाणी पाजून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थ आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीने त्याला डोंगरावरून खाली आणण्याची धडपड सुरू होती ,पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका हे मृत्यूमागील कारण असू शकते.सध्या राज्यभर प्रचंड उष्णतेची लाट सुरू असून प्रशासनाने नागरिकांना ट्रेकिंग करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुरेसे पाणी, ग्लुकोज आणि प्राथमिक उपचार साहित्य सोबत ठेवावे तसेच दुपारच्या वेळेत गिर्यारोहण टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.रितेशच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
