रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाजवळ गुरूवारी पहाटे अग्नीतांडव पहायला मिळाला. ठाण्यातील अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावदेवी भाजी मार्केटला पहाटे 4 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये अनेक दुकाने आणि गोडाऊन जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान आणि सुरक्षा रक्षक होरपळल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. या आगीत गावदेवी भाजी मार्केट येथील सुरक्षा रक्षक व आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती उपायुक्त डॉक्टर,मिताली संचेती यांनी दिली आहे.
काळू शंकर गाडेकर,वय वर्षे 53, ठाणे महानगरपालिका, आरक्षक,आणि सागर शिंदे, वय वर्षे 43, ठाणे महानगरपालिका अग्निशन केंद्र, स्थानक अधिकारी, अशी मृतांची नावे आहेत. तर सुजित पष्टे,वय वर्षे 45, ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र, स्थानक अधिकारी,आणि समीर जाधव,वय वर्षे 40, ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र, तांडेल,हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ही आग अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या कडून विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.रायगड लोकधारा न्यूज, ठाणे.
