रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल येथील आदई सर्कलला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यात आलेले असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून क्रिकेट थीम उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिक व क्रांतिवीरप्रेमीत नाराजी व्यक्त होत आहे. सदर क्रिकेट थीम येत्या १५ दिवसांमध्ये हटवून त्या ठिकाणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उभारण्यात यावे अन्यथा पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे एक लाक्षणिक उपोषण आदई सर्कल येथे करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक यांनी पत्राद्वारे दिली आहे त्याबाबतचे पात्र देखील त्यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे ते पहिले मोठे क्रांतिकारक होते. रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात त्यांचा जन्म झाला होता. इंग्रज सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात त्यांनी सामान्य जनता, रामोशी, कोळी, धनगर आणि इतर समाजघटकांना एकत्र करून स्वराज्यासाठी संघर्ष उभारला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले. इंग्रज सरकारने त्यांना अटक करून एडन येथील तुरुंगात ठेवले, जिथे 17 फेब्रुवारी 1883 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या बलिदानामुळे पुढील अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या माहितीपट चौकात लावण्याऐवजी दिलीप वेंगसकर क्रिकेट अकॅडमी ज्याचा काहीही उपयोग नाही अशांसाठी चौकात क्रिकेट थीम उभारणे म्हणजे महापुरुषांचा अवमान आहे तरी याबाबत येत्या १५ दिवसात जर का हि क्रिकेट थीम हटवून त्याठिकाणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित थीम लावली गेली नाही तर आदई सर्कल येथे एकदिवस लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
