रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / ठाणे : ठाणे शहरात झेन जीने रस्त्यावर उतरून आपल्या मनातील खदखद गाणी, मेलोडीवाटप आणि घोषणांमधून दाखवून दिली. ठाण्यातील तरूणांनी पेपरफुटी, बलात्कार, बेरोजगारी याविरोधात एकत्र येत “काॅक्रोच आंदोलन” केले. या आंदोलनात मोदी आणि मेलोनी यांची वेषभूषा केलेल्या तरूण-तरूणींनी मेलोडी चाॅकलेटचे वाटप केले. तर, या आंदोलकांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम हे रस्त्यावर उतरले. काल दुपारी चार वाजेच्या सुमारास ठाण्यातील तरूणांनी मासुंदा तलावाच्या कट्ट्यावर अनोखे आंदोलन केले. रॅप साँग, मोदी- मेलोनी, फ्लॅशमाॅब आदींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार निषेध केला. या आंदोलनात, पेपर लिक की ये सरकार , नही चाहिऐ अब की बार; महंगाई की ये सरकार, नही चाहिऐ अब की बार; बेरोजगारी को कोन जिम्मेदार; अदानी- अंबानी की सरकार ; इंकलाब जिंदाबाद; पढ़े लिखे है बेरोजगार, पेपर लीक की ये सरकार; परीक्षा नहीं व्यापार, बंद करो यह अत्याचार आदी घोषणा तरुणांकडून देण्यात आल्या. तसेच, काॅक्रोच पार्टीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले रॅप गाणे वाजवून तरूणांनी फ्लॅशमाॅब केले. विशेष म्हणजे, मोदी आणि मेलोनीच्या वेशभूषेत आलेल्या तरूणांनी चक्क मोदी – मेलोनींचा अभिनय करीत उपस्थितांना मेलोडी चाॅकलेट वाटप केले. शिवाय, मोदींनी मेलोडीचे नव्हे तर बेरोजगारीचा प्रमोशन करावे, असे आवाहन केले.
या आंदोलनात डाॅ.जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, अभिजीत पवार हेदेखील सहभागी झाले. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी देशातील तरूणांना झुरळ संबोधले होते. त्यातून ही काॅक्रोच जनता पार्टी सोशल मिडीयावर जन्माला आली आहे. आपल्या देशात अनेकांना शिक्षण मिळत नाही. ज्यांना शिक्षण मिळते, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळेच तरूण वैफल्यग्रस्त झालः आहेत. या वैफल्यग्रस्त तरूणांना काॅक्रोच म्हणणे संयुक्तिक नाही. भारतात जगातील सर्वाधिक युवाशक्ती आहे. या युवाशक्तीचा उद्रेक होईल, असेच हे भाष्य आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. परराष्ट्र धोरण पुरते फसले आहे. अशा स्थितीत काॅक्रोच हा तरूणांसाठी केलेला शब्दप्रयोग अंगाशी आला आहे. आज काॅक्रोच जनता पार्टीचे 25 मिलियन फाॅलोवर्स झाले आहेत. तेवढे कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाहीत. यावरून तरूणांच्या मनातील राग दिसून येत आहे.” मनोज प्रधान यांनी, काॅक्रोच जनता पार्टी ही सरकारविरोधातील भावना आहे. हे आंदोलन करणारे तरूण आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. त्यांनी मदत करण्याची विनंती केली होती. आम्ही त्यांच्या बोलवण्यावरूनच आंदोलनात सहभाग घेतला आहे. आंदोलक सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांच्या भावना या आंदोलनातून सरकारपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आज काॅक्रोच जनता पार्टीचे फाॅलोवर्स वाढत आहेत. त्यामुळे त्यांचे अकाउंट हॅक कराल पण डोक्यातील रोष कसा लाॅक कराल?, असा सवाल केला. तर, अभिजीत पवार यांनी, सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज केला जातो. बलात्कार विरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरूणांना गुन्ह्यात अडकविले जाते. आज तरूण रस्त्यावर उतरले आहेत. आम्हा तरूणांना झुरळ म्हटले जाते. उद्या हे काॅक्रोच काय करू शकतात, याची आज झलक दाखविली आहे. हे तरूण आमचे कार्यकर्ते नाहीत. पण, त्यांच्या विनंतीवरून आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत. आम्हीही काॅक्रोच आहोत, असे सांगितले.
या आंदोलनात राष्ट्रवादी (श.प.) च्या वतीने नगरसेवक यासीन कुरेशी, सुधीर भगत, शाकिर शेख, नगरसेविका मनिषा भगत यांच्यासह मिलिंद बनकर, गजानन चौधरी, राजेश साटम, केतन जेधे, महेश भाग्यवंत, साहिल उदुगडे, माधुरी सोनार, शशी पुजारी, कैलास हावळे, महेश मोरे आदी सहभागी झाले होते.
