रायगड लोकधारा वृत्तसेवा :
शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या नावांचाही करण्यात आला उल्लेख ; त्यांच्याकडेही मोठी रक्कम वर्ग झाल्याचा आरोप…
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पनवेल : पनवेल तालुक्यातील शिवकर येथील श्री गणपती देवस्थान ट्रस्ट संचालित श्री गणपती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेच्या विश्वस्तांनी सुमारे ३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच अनिल ढवळे यांनी केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील कॅनरा बँकेच्या खात्यातून विविध व्यक्ती आणि कंपन्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित खाते “श्री गणपती मिडीयम स्कूल, शिवकर” या नावाने असल्याचा दा करण्यात आला आहे.
या कथित व्यवहारांमध्ये काही व्यक्तींना लाखो रुपयांचे पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामध्ये मुख्याध्यापिका सुनीता वसंत जाधव, प्रणित दीपक म्हात्रे, मनोहर पदु ढवळे, वामन गणू ढवळे, जयेश वामन ढवळे, प्रदीप मनोहर ढवळे, अनेश गणू ढवळे, तसेच श्रीराम एंटरप्राइजेस, श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस व योगेश इलेक्ट्रिकल या उद्योग कंपन्यांचा समावेश असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये काही व्यवहार हे २५ लाखांपासून ते ६४ लाख रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्याकडेही मोठी रक्कम वर्ग झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, “उघडा डोळे, बघा नीट ! भ्रष्टाचार ! भ्रष्टाचार!!” अशा घोषणांद्वारे अनिल नामदेव ढवळे व ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. उपोषणकर्ते अनिल नामदेव ढवळे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याविरोधात सोमवार दिनांक २५ मे पासून आमरण उपोषणाच्या तयारीत आहे. पंचायत समिती कार्यालय परिसर अलिबाग या ठिकाणी या उपोषणाचा स्थळ निश्चित करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे संतापाची लाट असून, शाळेतील आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, या आरोपांबाबत शाळा प्रशासन किंवा संबंधित विश्वस्तांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
