Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पुणे : पुण्याच्या मुंढवा परिसरात दारूच्या नशेत बेधुंद होऊन कार चालवणाऱ्या एका तरुणाने ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतीसाठी पोहोचलेल्या पोलिसांनाच या कारचालकाने अद्वातद्वा बोलत शासकीय कामात अडथळा आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रज्ज्वल सोमनाथ म्हस्के (वय २७, सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. २३ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुंढवा रेल्वे पुलाजवळील वजन काट्यासमोर हा प्रकार घडला. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा करणाऱ्या प्रज्ज्वलला शांत करण्यासाठी पोलीस अंमलदार प्रशांत नायडू गेले असता, त्याने थेट पोलिसांवरच गंभीर आरोप करत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना पाहताच प्रज्ज्वलचा पारा चढला आणि तो पोलिसांना म्हणाला, “तुम्ही पोलीस विकले गेले आहात, बलात्कार होतो तेथे तुम्ही येत नाही आणि येथे येऊन आम्हाला त्रास देता!” असे म्हणत त्याने पोलिसांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने फिर्यादी पोलीस अंमलदार नायडू यांच्या हातातील शासकीय मोबाईल हिसकावून तो जमिनीवर जोरात आपटून फोडला आणि त्यांना हाताने मारहाणही केली. खाकी वर्दीवर हात टाकून थेट पोलिसांवरच हल्ला चढवल्याच्या या प्रकरणाची मुंढवा पोलिसांनी अत्यंत गंभीर दखल घेतली असून, आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
