Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी । माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘स्वर संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाने पनवेल परिसरातील संगीतप्रेमी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. ‘लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती’, ‘श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ’ आणि नादब्रह्म साधना मंडळ, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात पार पडला.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी, ह.भ.प. महादेवबुवा शाहबाजकर आणि अॅड. प्रसाद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘सारेगमप लिटल चॅम्प’ फेम गायिका अंजली गायकवाड आणि ज्ञानेश्वरी गाडगे यांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थितांची मने जिंकली. भावगीत, भक्तिगीत, अभंग तसेच लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या सुरेल आवाजाने निर्माण केलेल्या संगीतविश्वात उपस्थित तल्लीन झाले होते. पं. प्रतापबुवा पाटील यांची मृदुंग साथ, प्रसाद पाध्ये यांची तबला साथ आणि सूर्यकांत सुर्वे यांचे तालवाद्य वादन यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिक खुलली.
